Ad will apear here
Next
प्रिय नरेंद्र मोदीजी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहे. या निमित्ताने ‘किमया’ सदरात आज, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेले हे खुले पत्र... 
.............
आदरणीय प्रधानमंत्रीजी,

पंतप्रधानपदी सलग दुसऱ्यांदा विराजमान झाल्याबद्दल प्रथम अभिनंदन! तुम्ही पुन्हा निवडून यावे, अशी अपेक्षा आणि खात्री देशभरातील सर्व स्तरांतल्या लोकांना होती. किरकोळ अपवाद वगळता, विरोधी पक्ष आणि माध्यमांना मात्र हे वास्तव ध्यानातच आले नाही; किंवा ते जाणून घ्यायची त्यांना इच्छा नव्हती. भलेभलेही त्यात समाविष्ट होते. त्याला कारणे अनेक होती-आहेत. सत्तेची लालसा, फाजील आत्मविश्वास, धनाची लालूच, स्वत:च्या (कृष्ण) कृत्यांना शिक्षा मिळू नये यासाठी धडपड, अचूक विश्लेषण करण्याचा भ्रम आणि तुमच्याबद्दल आत्यंतिक द्वेष! निःस्वार्थ बुद्धीने कोणी देशहितासाठी दिवसरात्र झटू शकतो, हे कोणाच्या गावीच नव्हते. तुमचा सर्वांत चांगला गुण म्हणजे तुम्ही त्या सगळ्या अप्रिय, विरोधी, उघड शत्रुत्व करणाऱ्या गोष्टींकडे/लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि हाती घेतलेल्या, नियोजित कामांना पूर्णपणे न्याय दिला. समजा, तुम्ही पुन्हा निवडून आला नसतात, तरी निरिच्छपणे, आनंदाने हिमालयातील एखाद्या गुहेत उर्वरित आयुष्य घालवू शकला असतात, हे सत्य आहे. परंतु, स्वत:च्या उद्धारासाठी (मोक्षप्राप्तीसाठी) साधना करण्यापेक्षा देशाचा उद्धार आणि उत्कर्ष महत्त्वाचा आहे, हे तुमचे ‘लक्ष्य’ ठरलेले होते. हा ईश्वरी संकेतच असतो, मानवी नव्हे; आणि अशा प्रामाणिक, ऋषितुल्य व्यक्ती वेळोवेळी भारतात जन्माला येत असतात, हे आपले भाग्यच!





गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला राज्यकारभाराचा प्रचंड अनुभव मिळाला. ते पदसुद्धा अचानक चालत आले होते. त्याआधी संघाचे प्रचारक म्हणून, निरनिराळ्या जबाबदाऱ्या पेलत तुम्ही जे काम केलेत, तोच पुढे प्रधानमंत्री बनण्याचा भक्कम पाया ठरला. साधी राहणी, स्वच्छता, टापटीपपणा, शिस्त, व्यायाम, नैतिक आचरण, अखंड परिश्रम यांचा तो परिपाक होता. गावोगावचा प्रवास आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर तळमळीने बोलणे, हे तुमच्या उत्तम अंगवळणी पडले. ‘मन की बात’ हा त्याचाच एक आविष्कार होता. राजाने ज्या ज्या विद्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, त्याचे विवेचन ‘कौटिल्याच्या अर्थशास्त्रा’त आहे. तुम्ही ते सर्वकाही आरंभीच्या काळातच आत्मसात केले. त्यातूनच उच्च आत्मविश्वास निर्माण झाला. राजकारणात वर्षानुवर्षे वावरणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनाही त्याची कल्पना आली नाही. अत्युच्च पदी आरूढ होण्याचा मार्ग त्यातूनच प्रशस्त झाला.

मुख्यमंत्रिपदाच्या सुरुवातीच्या काळातच निर्माण झालेल्या अवघड, गुंतागुंतीच्या प्रश्नांशी यशस्वी मुकाबला केल्यानंतर, वृत्तपत्रांसह सर्व माध्यमांनी तुमच्याविरुद्ध जणू युद्धच पुकारले. तुम्हाला हुकूमशहा ‘हिटलर’ पदाला नेऊन बसवले. पत्रकार परिषदा आणि माध्यमांशी संवाद साधण्याचे त्या वेळी केलेले प्रयत्न व्यर्थ झाले. कारण प्रश्नच विचित्र विचारले जात होते. सत्य जाणून घेण्याची कोणालाच इच्छा नव्हती. तेव्हाच तुम्ही निर्णय घेतला असावा, की पत्रकारांच्या नादी लागायचे नाही. आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचे - ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ या गीतेच्या वचनाप्रमाणे देशसेवेसाठी अखंड कार्यरत राहून आपल्या सहकाऱ्यांनाही त्याच मार्गावरून नेण्याचा प्रयत्न करायचा. स्वयमेव मृगेंद्रता! वनराजाला कोणाच्या मान्यतेची, प्रशंसेची, आदरसत्काराची गरज नसते. विरोधी पक्ष वर्षानुवर्षे आपल्याच धुंदीत, भ्रामक जगात, अहंकारग्रस्त आणि बेसावध राहिले. किती वर्षे त्यांचा टिकाव लागू शकेल? एक ना एक दिवस त्यांना सत्ता गमवावी लागणारच होती. त्याची परिणती म्हणजे २०१४मध्ये आणि पुन्हा २०१९मध्ये तुमची झालेली निवड. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका भाजपच जिंकणार, हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. विरोधी पक्षाचे लोक स्वार्थ विसरून एकमेकांचे हित सांभाळत एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही.



मोदीजी, तुमची ‘ना खाऊंगा, ना खाने दूँगा’ ही घोषणा काही प्रमाणात यशस्वी ठरली आहे. नव्याने मोठे घोटाळे तरी झाले नाहीत. ‘ना खाऊंगा’ याबद्दल कोणालाच शंका नाही; परंतु ज्या खात्यांमध्ये वर्षानुवर्षे ‘खाबुगिरी’ चालू होती, ती तशीच व्यवस्थित चालू आहे. काही ‘भाजप’वालेही त्यात समाविष्ट आहेत. रक्तात भिनलेले भ्रष्टाचाराचे विष उतरवण्यासाठी कडक ‘डायलिसिस’ची गरज आहे. सगळेच आपले आहेत. ही उपाययोजना कठोरपणे, परंतु ‘चातुर्या’ने तुम्हीच करू जाणे! कोणत्याही प्रश्नासाठी किंवा तक्रार करण्यासाठी, आता थेट तुमच्याशी संपर्क साधता येतो. त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ही गोष्ट खूपच अभिनंदनीय आहे. या आधुनिक तंत्राची ओळख नसलेल्या सामान्य जनतेलाही त्याचा सहजपणे लाभ घेता येईल, इतका सोपेपणा त्यात आणता आला, तर अधिक सोयीचे होईल.

गेल्या पाच वर्षांत सुरू केलेली कामे वाखाणण्यासारखी आहेत. येत्या पाच वर्षांत त्यांची परिपूर्ती होईल आणि काही नवीन ‘धक्कातंत्रा’ची कामेसुद्धा अंमलात येतील. भारताला सर्वच बाबतींत जागतिक उंचीवर नेऊन ठेवणे, हे तुमचे ध्येय आहे. आपल्याकडे बुद्धी आहे, क्षमता आहे, परिश्रम करण्याची तयारी आहे. त्यामुळे ते ‘लक्ष्य’ गाठणे काहीच कठीण नाही. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हे त्याचे सूत्र आहे. ‘सब का साथ, सब का विश्वास और सब का विकास!’ काही काळ आपले अधिकार विसरून कर्तव्यांचे पालन करणे गरजेचे आहे. नोटाबंदी, जीएसटी या विषयांवर खूप आरडाओरड झाली. काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. त्यांच्या परिणामांचा अभ्यास करून वेळोवेळी सुधारणा कराव्या लागतात. त्या होत आहेतच. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये आता शिक्षण, आरोग्य, रोजगार यांचीही भर पडली आहे. त्या प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म विचार करून, कार्यक्रमांची आखणी झाली पाहिजे - होतही आहे. मूलभूत सेवा-सुविधांसाठी काही काळ जाणारच.

आपल्या देशात अनुभवी ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. आदर्श, स्वयंपूर्ण, जगाचे नेतृत्व करू शकेल, अशा भारताच्या उभारणीसाठी या ज्येष्ठांची अनमोल मदत होऊ शकेल. दिवसाचे सहा ते आठ तास ते सहज देऊ शकतील. आपल्या शिक्षण घेतलेल्या आणि आवडीच्या क्षेत्रात त्यांना काम करता येईल. त्यासाठी वयाचा अडसर नाही. ७५ वर्षांचा वृद्धही एखाद्या तरुणाला लाजवेल असे काम करू शकतो. फक्त त्याला योग्य ते पाठबळ मिळाले पाहिजे. राजकीय नेत्यांची तशी मानसिकता निर्माण झाली पाहिजे. उदाहरणार्थ - आज माझे वय ७४ आहे; तरीही लेखन, प्रकाशन, वाचनसंस्कृतीचा विकास, ग्रंथालय चळवळ या क्षेत्रांमध्ये मी पूर्ण वेळ कार्यरत आहे. सध्या त्यात अनेक अडचणी, मरगळ आणि त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारच पाठीशी उभे राहिले पाहिजे. परंतु राजकारण्यांना त्यासाठी वेळ नाही. स्वत:चे पद टिकवणे, निवडणुका यातच ते गर्क आहेत. ज्या चुका आधीच्या राज्यकर्त्यांनी केल्या, त्या तुमच्या आधिपत्याखालील राज्यांमध्ये तरी होऊ नयेत आणि त्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. प्रश्न अनेक आहेत. शिक्षण, वीज, निवास, पिण्याचे पाणी, रोजगार, वैद्यकीय सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची फार मोठी मदत होऊ शकेल.

तेव्हा मोदीजी, अशी ज्येष्ठांची एक मोठी फौज देशात उभारा. त्यातून आपला देश विकासाची नवनवी शिखरे गाठील, हे ब्रह्मवाक्य आहे. तुम्हाला एकदा भेटावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. तुमच्या व्यग्र कार्यक्रमांमधून फक्त ३० मिनिटे वेळ द्या. तुम्ही असे लोकांना भेटता, हे सर्वांना ठाऊक आहे. माझ्या क्षेत्रांमध्ये मी काय काय ‘चमत्कार’ घडवू शकतो, ते मी समक्ष सांगेन. आपल्या प्रतिसादाची वाट बघत आहे.

- रवींद्र गुर्जर, पुणे

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

हेही जरूर वाचा : 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZYWCB
Similar Posts
उडत्या तबकड्या (उत्तरार्ध) उडत्या तबकड्यांचे गूढ अद्याप उलगडलेले नाही, हे खरे असले, तरी त्यांच्या नोंदी मात्र बऱ्याच झाल्या आहेत. अनेक ठिकाणी अशा उडत्या तबकड्या दिसल्याचे अनुभव लोकांनी लिहून ठेवले आहेत. त्यावरून त्यांचा काही अभ्यास, वर्गीकरण करण्यात आले. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ सदरात आज उडत्या तबकड्यांच्या लेखाचा उत्तरार्ध
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
काश्मीर शैवमत ऋग्वेदात रुद्रदेवतेचे स्तवन आहे. त्या काळापासून शंकराला उत्पत्ती आणि विनाश करणारा सर्वश्रेष्ठ देव मानण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. त्यालाच शैवमत असे म्हणतात. भारतात शैवमताचे अनेक उपपंथ आहेत. काश्मीर शैवमत ही त्यातीलच एक प्रसिद्ध परंपरा आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत काश्मीर शैवमताबद्दल
यंदाचा ऑस्करविजेता चित्रपट - ग्रीन बुक २०१९चा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. ग्रीन बुक हा चित्रपट त्यात सर्वोत्कृष्ट ठरला. या चित्रपटाला एकूण तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले. या चित्रपटाबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language